Ganesh Mandal Pune

मंडळाची माहिती

श्री गणेशाय नमः
अकार चरण ॥ उकार उदर
मकार महामंडळ ॥ मस्तका कोर
हे तिन्ही एकवटले ॥ तेच शब्दब्रह्म कवळले
तोचिया गुरुकृपा नमिले ॥ आदि बीज

भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी दिवशी श्रीगणेशाची पुजा संस्कृत व पौराणीक मंत्रांनी केल्यास सात्वीक आनंद मिळतो . दुखं हरण होवून जीवन सुख संपन्न बनते, मंगलमुर्ती गणेश हि विदयेची, समृद्धी व ऐश्वर्याची देवता आहे, म्हणून श्रीगणेशाला अग्र पुजेचा मान आहे.

माणूस आणि परमेश्वर यांचे नाते अनादी आणि अतूट आहे.माणसाच्या अंत:करणात सुद्धा देव आणि श्रद्धा आहे म्हणून माणसाला घरातही देवघर लागते. जे बेघर असतात ते झाडाखाली देखील आसरा तयार करतात, त्या आसरयामध्ये पहिले स्थान देवाला असते, त्यामध्ये त्याची अंत:करणातून निर्माण होणारी भक्ती असते.म्हणूनच माणूस रोज देवाची पूजा, आरती, नैवेद्य यामधून समाधानी होतो.

पण माणसाला फक्त देवाचे वेड असून चालणार नाही, त्याला जगाचे जीवनाचे, समाजबांधवाचे पण वेड हवे. देवाने माणसात यावे आणि माणसाने देवासारखे व्हावे असे अनेक पुण्यपुर्षाना वाटते. देव आणि माणूस यांची जवळीक साधणारा देवमाणूस म्हणजे "लोकमान्य टिळक "

लोकमान्य टिळकांनी गणेशाच्या उपासनेस धर्माचे रूप दिले. जीवनाच्या सर्व अंगांचे संवर्धन करणारी प्रयोगशाळा म्हणून गणेशोत्सवाकडे पहिले. पारतंत्र्याच्या काळात भयभीत झालेल्या देशवासीयांना धेर्य आणि विचार प्रदान करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी असे सांस्कृतिक व्यासपीठ तयार केले.

मराठा तितुका मेळवावा ॥ महाराष्ट्र धर्म वाढवावा ॥

या समर्थाच्या उदगारांना लोकमान्यांनी आगळा आशय प्राप्त करून दिला. जीवनाच्या सर्व अंगाचे संवर्धन करणारी प्रयोगशाळा म्हणून मुर्तीमंत मरण असे, लोकमान्यांनी समाजास गर्जून सांगितले कि "लोक " या नावाचे शक्तीपीठ स्थापन करावे आणि लोकसत्तेचा संकल्प जनजीवनात रुजवावा, यासाठीटिळकांनी या धार्मिक उत्सवाचे प्रवर्तन केले.

लोकमान्यांनी अभिप्रेत असणारा गणेशोत्सव व गावो गावी प्रत्यक्ष चालणारा गदारोळ यात जमीन आसमानाचे अंतर आहे. या उत्सवाला एक प्रकारची अवकळा येत चालली आहे, त्यात शिस्त आणि संस्कार यांचा ऱ्हास होत चालला आहे आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते

"गणेशोत्सव हा नुसता उत्सव नाही तर तो स्वातंत्र्याचा जनक आहे."

प्रत्येक दहा वर्षानंतरच्या गणेशोत्सवामध्ये आमूलाग्र बदल होत गेले व प्रत्येक मंडळाने आपपल्या पद्धतीने त्या त्या समस्या लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वर्षी समाजापुढे आलेली संकटे उदा. मागीलवर्षी उदभवलेला महाभयानक "स्वाईन फ्लू "या रोगाने पुणे शहरातील शेकडो नागरीकांना मृत्यूची वाट दाखवली, लागलीच पुणे शहराती शेकडो मंडळांनी संसर्गजन्य अशा रोगाला प्रतिकार करण्यासाठी उत्सफुर्तपणे देखावे न करता , नागरीकांना सर्वतोपरी रोगाविषयी माहिती देवून जनजागृती केली, कारण हा आजार गर्दीच्या ठिकाणी जास्त पसरतो व गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून व देशातून लोक पुणे शहरात येत असतात व गर्दी होत असते. गर्दीला नियंत्रात ठेवण्यासाठी हजारो पोलीसकर्मी , होमगार्ड, स्वयंसेवक त्यांच्या मध्ये मिसळून संरक्षणाची व नियंत्रणाची जबाबदारी पार पडत असतात , हे ओळखून आझाद हिंद मित्र मंडळाने सुद्धा पाच हजार पोलिसांना स्वाईन फ्लू विरोधी मास्कचे वाटप करून पोलिसांच्या आरोग्याचीसुद्धा दक्षता बाळगली व गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला.

दरवर्षी मंडळ काहीना काही नवीन संकल्प करीत असते. सध्याच्या गणेशोत्सवाचे स्वरूप पाहता अनावश्यक स्पिकर सिस्टिम, गुलाल, फटाके, दिर्घवेल, चालणारी मिरवणूक इ. सर्व गोष्टीमुळे सामान्य जनतेला होणारा त्रास टाळून व अनाठायी खर्च प्रामुख्याने न करता जास्तीत जास्त बचत करण्याच्या मंडळाच्या धोरणामुळे प्रत्येक वर्षी मुदत ठेव होऊन व त्यामध्ये वाढ करून २०१ तोळे वजनाचे सुवर्णअलंकार व श्रीसाठी भव्यदिव्य मखर तयार करण्यात मंडळाला यश आलेले आहे.

सन २००८ मध्ये मंडळाने " भगवान शंकराचे लग्न " हा ३० मुर्त्या असलेला भव्यदिव्य हलता देखावा सदर करून पुणेकर व बाहेरील लोकांच्या डोळ्यात पारणे फेडले आहे. श्री गणेशोत्सव काळामध्ये आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाच्या ठिकाणी अहोरात्र झटून लोकांची कोणत्याही प्रकारची गेरसोय होउ दिली नाही . त्याचे सर्व श्रेय मंडळाच्या होतकरू कार्यकर्त्यांनी जाते . चालू वर्षी मंडळाने " श्रीकृष्ण लीला "हा २५ मुर्त्यांचा भव्य हलता देखावा सदर करण्याचे ठरविले आहे. सालाबादप्रमाणेच आपण सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्याने यंदाही गणेशोत्सव आनंददायी वातावरणात पार पडेल.

यावर्षी मंडळा ६९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे, या निमित्ताने मंडळाला परोपरीने सहकार्य करण्याचे जाहिरातदार , देणगीदार, हितचिंतक,पत्रकार, पोलीस खाते, महानगरपालिका, संबधित संस्था आणि व्यक्ती यांसकडून आर्थिक, सामाजिक, आणि शाररीक मिळत आलेल्या सहयोगाचा हा नंदादीप आपल्या साक्षीने प्रज्वलित करीत असताना आम्हा साऱ्या कार्यकर्त्यांना अत्यानंद होत आहे.

गतवर्षी आम्ही केलेल्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपण जी भरघोस, आर्थिक मदत मंडळास देऊन जे सहकार्य दिले, त्याबद्दल सर्व वर्गणीदार ,देणगीदार,हितचिंतक , आश्रयदाते बंधू व भगिनीचे मंडळा शतश: ऋणी आहे.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व प्रेमाने उत्सवाची धुरा आम्ही साभाळीत आलो आहोत. पुन्हा एकदा आपल्या आशीर्वाद व प्रेमाची अपेक्षा करीत आहोत तशीच आपली भरघोस मदत अपेक्षित आहे .आम्हास निराश करणार नाही, याबद्दल खात्री आहेच, असो .

आपणास सर्व बंधू- भगिनींना सुख लाभो, जीवनात शांती नांदो, अशी प्राथर्ना श्री गजाननास करून हे निवेदन इथे संपवित आहे.

पायी हळूहळू चला ॥ मुखाने मोरया बोला ॥ कापली केशरी गंध ॥ गणेशा तुझा मला छंद ॥
आपला स्नेहांकित
श्री . अनिल वामनराव पायगुडे
श्रीमंत आझाद हिंद मित्र मंडळ ट्रस्ट